Ye re ghana asha bhosle biography

अळुमाळू-अल्प.
वेणु-बासरी.
आरती प्रभुंची एक अम्लान कविता आहे-
ये रे घना
ये रे घना
न्हावूं घाल
माझ्या मना

कुणाला घातलेली साद आहे ही? प्रखर उन्हानं पोळलेल्या, तडफडणार्‍या शरीराला तुडुंब भरून आलेला पावसाळी ढग न्हाऊ घालतो खरा; पण मनाला न्हाऊ घालणाराही फक्त तोच आहे ! की हा कोरड्या आयुष्याला ओला दिलासा देणारा स्‍नेहाचा मेघ आहे? की सर्जनाचा सजल संभार आहे.. मनाला नवे फुटवे आणणारा? माहीत नाही. कदाचित हे सगळं असेल एकत्रपणे.
फुलें माझी
अळुमाळू
वारा बघे
चुरगळूं

नको नको
म्हणतांना
गंध गेला
रानावना

मूळ कविता ही अशी. एवढीच. वार्‍यानं नाजूक फुलं चुरगळली आणि गंध सर्वभर नेला, त्याची कहाणी सांगणारी. पहिल्या ओळी आल्या त्या १९५७-५८ साली कधीतरी. कविता म्हणून त्या आल्याच नाहीत. समोर होते तेही 'सजल श्याम घन' नव्हते. शुभ्र पांढरा रंग होता त्यांचा. पण न्हाऊ घालणारा मेघ पांढरा थोडाच असतो? ओळी तर आल्या त्या तशाच. समोरचे शुभ्र ढग हे निमित्त. पण त्या ओळींमध्ये कवितेचा श्वास हलला नव्हता. कितीतरी दिवस ! नव्हे, कितीतरी वर्षं !

मग आरती प्रभु कोकणातलं आपलं लहानसं कुडाळ गाव सोडून मुंबईला आले. कुडाळला त्यांची खाणावळ होती. ती बंद करून बायको-मुलांना मामाकडे ठेवून नोकरीसाठी ते मुंबईसारख्या महानगरात आले. पण इथेही त्यांचा जीव रमत नव्हता. हे जग आपलं नव्हे, असं पुन्हापुन्हा जाणवत होतं. गावाकडे परत जावंसं वाटत होतं. पण तिथे परतण्याची वाट आता बंद झाली आहे, हेही कळत होतं.

१९६९ साली 'दिवेलागण' या संग्रहात प्रसिद्ध झालेली ती कविता एवढीच होती. आरती प्रभुंनी स्वत:च या कवितेमागची कथा लिहून ठेवली आहे. तेव्हा ते मुंबई नभोवाणीवर नोकरी करत होते. मंगेश पाडगावकर तिथेच कार्यक्रम अधिकारी होते. त्यांच्यामुळेच तर ती नोकरी मिळाली होती. एक दिवस आकाशवाणीवर बिस्मिल्ला खाँच्या सनईवादनाचं ध्वनिमुद्रण होतं. पाडगावकरांच्या आग्रहामुळे स्टुडिओत बसून आरती प्रभु ते वादन ऐकत होते. ऐकता ऐकता कोकणातलं आपलं गाव आठवलं त्यांना. तिथले चौघडड्याबरोबर वाजणारे सनईचे सूर आठवले आणि 'ये रे घना, ये रे घना' या निव्वळ शब्दांमधून कवितेचा श्वास हलू लागला आणि आणखी आठ ओळींची त्यात भर पडून कविता पूर्ण झाली.

मग एक दिवस पं. हृदयनाथ मंगेशकरांनी तिला चाल दिली आणि आरती प्रभुंच्या लक्षात आलं की, हृदयनाथांनी अगदी उत्स्फूर्तपणे तिला पुन्हा जन्माला घातलं आहे. आज आपण ही कविता गाणं म्हणून ऐकतो तेव्हा आपल्यालाही ते जाणवतं. वाटतं की, ही कविता नुसती कागदावर छापलेली होती तेव्हा पूर्ण नव्हती झालेली. ऐकल्यानंतरच ती पूर्ण झालेली हे कळते आहे. जणू या कवितेचे कवी एकटे आरती प्रभू नाहीतच. हृदयनाथही आहेत. त्या कवितेतला अनुभव तिचं गाणं झाल्यानं पुरा झाला आहे.

अर्थात त्यासाठी तिचा विस्तारही आरती प्रभूंनी नंतर केला आहे. जणू एक विश्राम घेऊन, एका टप्प्यावर मुक्काम करून नंतर ती पुढे निघाली आहे-
टाकुनिया घरदार
नाचणार नाचणार
नको नको म्हणताना
मनमोर भर राना

नको नको किती म्हणू
वाजणार दूर वेणू
बोलावतो सोसाटय़ाचा
वारा मला रसपाना

कशी स्वत:मधून सारखी नव्या-नव्याने स्फुरत राहणारी आहे ही कविता ! फुलं आहेत, वारा आहे, नाचणारा मोर आणि वाजणारी बासरी आहे. तरीसुद्धा या सगळ्या गोष्टींची सांकेतिकता सहज दूर सारून येते ही. एक सुखावणारी आर्तता हिच्यात हेलावत राहिली आहे.
ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल.. कोण म्हणतं आहे हे? ही कुणाची आळवणी आहे? आरती प्रभुंनी स्वत:च हे प्रश्‍न विचारले आहेत. ही आळवणी का सुरू आहे? कशासाठी? कुणासाठी? आणि ही आळवणी करतंय तरी कोण? खरंच, ही आळवणी त्यांची आहे? आरती प्रभु नावाच्या कवीची? की त्यांच्या कवितेचा अंत:स्वर जागा करणार्‍या संगीतकाराची? की कवितेची स्वत:चीच?

वाटतं की, ही प्रत्येक माणसाची सदाचीच आळवणी आहे. आपली तगमग शमावी, दाह शांत व्हावा, जगण्याचा ओला गारवा आतपर्यंत झिरपत जावा, भिजावं मन यासाठी तान्हेल्या प्रत्येकाची आळवणी. तुमच्या-माझ्या मनात खोलवर सारखीच उमटत असलेली साद जणू आरती प्रभुंनी कविता होऊन प्रत्यक्ष घातली गेली आहे. आणि असं जर आहे, तर ही कविता पुरी झालेली नाहीच. प्रत्यक्षात ती जशी सुरुवातीला प्रसिद्ध झाली तेव्हा थोडी पूर्ण झाली, मग तिचं गाणं झालं तेव्हा आणखी पूर्ण झाली, मग तिचा गाण्यासाठी विस्तार झाला तेव्हा तिला अधिकच पूर्णता आली, तशी भिजण्यासाठी आसुसलेल्या प्रत्येकाच्या मनात ती सारखी नव्यानं पूर्ण होत राहणार आहे.. आणि तोवर ती अपूर्णच राहणार आहे. एखादी कविता अपूर्णतेचं असंही वरदान घेऊन येते ! ते तिचं भाग्य असतं, कवीचं भाग्य असतं आणि रसिकांचंही. आणि 'अंत ना आरंभही' अशी तिची ती दीर्घजीवी अपूर्णता पाहणारा काळ काय कमी भाग्यवान असतो का?
(संपादित)

अरुणा ढेरे
सदर- कवितेच्या वाटेवर
सौजन्य- दै. लोकसत्ता (१६ मे २००९)
(Referenced page was accessed on 20 May )

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment previously printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.